मुंबई, १० अगस्ट-एड्ससारख्या अनैतिक वर्तनाशी जोडल्या गेलेल्या आजाराच्या विरोधात जागृतीसाठी जर ठोस कार्यक्रम उभा राहात असेल आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यात त्याला यश येत असेल; तर समाजात झिरपलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात 'सभान' करणारा कार्यक्रम का आखला जाऊ नये? तात्पर्याच्या दिशेने जाणारा हा प्रश्न् शुभदा मैत्रा यांनी सादर केलेले संशोधन आणि त्याअनुषंगाने झालेल्या चचेर्अंती निर्माण झाला.
' फोरम अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लोरेशन' (फॅक्से) या संस्थेने शुभदा मैत्रा यांना त्यांची 'बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मानसिक आरोग्य' या विषयावरील विकसित केलेली संशोधनपद्धती सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते। मैत्रा यांनी टाटा समाजविज्ञान संस्थेतील 'केअर फॉर हेल्थ अॅण्ड मेण्टल हेल्थ' या शाखेच्या वतीने बाल लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या २० ते ४० वयोगटातल्या काही महिलांच्या मुलाखती आणि पाहणीतून हाती लागलेली सत्ये आणि निष्कर्ष समोर ठेवले. त्या म्हणाल्या की, सर्वाधिक बाल लैंगिक शोषणाचे प्रकार हे कुटुंब आणि कुटुंबाबाहेरील परिचयाच्या व्यक्तींकडूनच होतात. त्याला बळी पडणाऱ्या मुलांना ही काहीतरी वाईट, चुकीची गोष्ट आहे हे आतून कळत असतं पण ती त्याचा उच्चार करू धजत नाहीत. कारण आपण याविषयी बोललो तर इतरांच्या रोषाला बळी पडू, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा, चांगल्या गोष्टी यांना पारखे होऊ, अशी त्यांना भीती वाटते.
शिक्षक मुलांना मारतात तेव्हा त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा, असं पालक सांगतात का? मग आपल्यावरच्या अत्याचाराबद्दल मुलांनी बोलावं, अशी अपेक्षा पालक कशी बाळगू शकतात, असा प्रश्ान् करून मैत्रा म्हणाल्या की, अशा प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी पालकांनीच पुढाकार घ्यायला हवा।
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींना अनेक मानसिक आजार जडतात. सतत दु:खी-उदास राहणं, एकटं वाटणं, वजन कमी होणं, अनियमित निदा, दु:स्वप्न पडणं, एकाग्रता भंग पावणं, शिक्षणावरून लक्ष उडणं, भयगंड निर्माण होणं, स्मृतिभ्रंश, मानसिक दुभंग, व्यसनाधीनता, आत्महत्येचे प्रयत्न अशी अनेक लक्षणं त्यांच्या ठायी दिसू लागतात आणि मुख्य म्हणजे त्या आत्मप्रतिष्ठा गमावून बसतात, असे मैत्रा यांनी सांगितलं. आई-मुलीच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होणं, समवयस्क मित्र-मैत्रिणींशी संवाद तुटणं आणि पुरुषांवरचा विश्वास उडणं अशाही समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें