सोमवार, 7 जुलाई 2008

साहित्य संमेलन वादावर ठालेंना शिवसेनाप्रमुखांचे "टोले'

मुंबई - यंदाचे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत भरवण्याची घोषणा करून वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कौतिकराव ठाले-पाटीलांनी आता अमेरिकेबरोबरच रत्नागिरीतही संमेलन भरवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "सामना'च्या अग्रलेखातून नेहमीच्या ठाकरी शैलीत समाचार घेत टोले लगावले. अग्रलेखात ठाले-पाटील यांचा साहित्य सम्राट असा उल्लेख केला आहे.
अग्रलेखात ठाकरे म्हणतात, ८२ व्या साहित्य संमेलनाचा शिक्‍का अमेरिकेतल्या कि रत्नागिरीतल्या संमेलनावर बसणार?, तसेच अध्यक्षपदाच्या घोड्यावर कोणालातरी बसवल्यानंतर ते अमेरिकेतल्या कि रत्नागिरीच्या संमेलनाच्या व्यासपीठावरून भाषण ठोकणार? एकाचवेळी दोन्ही संमेलनाला हजेरी लावण्याचा "चमत्कार' कसा होईल?
डाव्यांचा अमेरिका विरोध लक्षात घेवून "उगाच पंगा नको' म्हणून अमेरिकेबरोबर रत्नागिरीतही संमेलन घेण्यास मान्यता दिली, अशी अफवा आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या वादात पडू इच्छित नाही। आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही अशाप्रकारच्या उत्सवास कधी हजेरी लावली नाही. मात्र मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मितेचा जेवढा जीर्णोद्धार करता येईल तेवढा केला असल्याचे ते म्हणतात.
मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातला मराठी माणूस टिकला पाहिजे. त्याला स्वतःच्या पायावर उभे करून उंच भरारी मारण्याचे बळ दिले पाहिजे. मराठी माणूस मनाने व पैशाने श्रीमंत होवू द्या. मग भाषेलाही समृद्धी लाभेल. मराठी साहित्यात जुने ते सोनेच होते. पण नवे काय ते जरा सांगा. दुसरे पु.ल., दुसरे कुसुमाग्रज होणे नाही. पण नवे रसरशीत काही निर्माण होणार की नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं: