सोमवार, 7 जुलाई 2008

मृत हरणाने केली आत्रामांची "शिकार'

मुंबई - चिंकारा हरणाच्या शिकारीप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या परिवहन राज्यमंत्री धर्मराज आत्राम यांना सोमवारी अखेर आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले। मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला आहे। त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाला नसलातरी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी हा निर्णय घेतला.
चौधरवाडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे १४ जूनच्या रात्री तीन अलिशान गाड्यांतून आलेल्या व्यक्‍तींनी शिकार केल्याचे स्पष्ट झाले होते. यातील एक मोटार परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.
आत्राम यांच्यादिशेने संशयाची सई फिरू लागल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरले. भोर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी पाचगणी येथील आत्राम यांच्या बंगल्याची झडती घेतली.
हरणाची शिकार ज्या ठिकाणी आणून ठेवण्यात आली, तसेच मांस जेथे शिजवण्यात आले, त्या जागेवर वन कर्मचाऱ्यांना अवशेष मिळाल्यानंतर आत्राम यांच्यावरील संशयाला अधिक बळकटी मिळाली.
हे प्रकरण आत्राम यांना चांगलेच भोवणार याची चर्चा होती, ती आज खरी ठरली.

कोई टिप्पणी नहीं: