अलिकडच्या काळात पालकांचा आपल्या मुलांना खासगी शाळेत ऍडमीशन घेण्याचा ट्रेन्ड वाढत चालला आहे। परिस्थिती असो वा नसो मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे असो पालकांचा अट्टाहास असतो. त्यातच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा ओढा असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. खासगी करण्याच्या बाजारात गरीबांची शाळा म्हटल्या जाणाऱ्या महापालिकेच्या शाळा ओस पडत चाललायं अशी ओरड सर्व थरातून करण्यात येत होती. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा कितीतरी पटीने मागे असून चांगल्या दर्जाचे शिक्षण या शाळा विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेच्या शाळा येत्या काही वर्षात बंद पडणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.
ही सर्व विधाने विधाने खोटी ठरवत मुंबई महापालिकेच्या शाळांचा यंदा दहावीचा निकाल ७२.२७ टक्के इतका लागला आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमधून सर्वप्रथम आलेल्या नमिता वाघमारे या विद्यार्थीनीने ९० टक्के गुण मिळविले आहे। महापालिकेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या भरमसाठ फी घेणाऱ्या खासगी धास्तावल्य आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गातून आणि झोपडपट्ट्यांतून विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहा हजाराने वाढली आहे.
समाजाच्या तळागाळातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास तसेच त्यांच्यावर संस्कार करण्याची अवघड जबाबदारी महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांवर असते। अशा प्रतिकूल परिस्थितीत आली आहे त्या साधनांच्या साहाय्याने मार्गक्रमण करत मुंबई महापालिकेच्या "एम वार्ड' मधील देवनार, मराठी शाळा क्र. 11ने आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करून खासगी शाळांच्या भाऊगर्दीत "हम भी किससे कम नही' हे दाखवून दिले आहे. 2008 या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वृषाली डौले या विद्यार्थीनीने 300 पैकी 274 गुण मिळवून मुंबई विभागातून 13 वी तर महापालिकेच्या शाळांमधून 3 री आली आहे. वृषालीने आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले शिक्षक वाठ, गोरडे, चव्हाण, खरात तसेच आदरणीय मुख्याध्यापक शिवाजी सानप सरांना देते. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आपल्याला हे यश मिळाल्याचे वृषाली सांगते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ताच सिद्ध केली नाही तर शासकीय एलिमेंटरी परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा, बालवैज्ञानिक, हस्तकला, चर्चासत्र अशा विविध स्पर्धात्मक परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून खासगी शाळांच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. शासकीय एलिमेंटरी परीक्षेचा यावर्षीचा या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. पालिकेच्या शाळा म्हटले की, गलिच्छ, बकाल, दर्जाहिन शाळा असा समज सर्वसमान्यांचा आहे. परंतु सामान्यांच्या या दृष्टीकोनाला अपवाद ठरणारी पालिकेची "एम वार्ड' मधील देवनारची ही शाळा आहे. त्यामुळे या शाळेची ही इमारत खासगी शाळेची आहे का पालिकेची असा संभ्रम निर्माण होता. माजी उपायुक्त एस.एस. शिंदे यांनी शिक्षण गुणवत्ता विकास वाढण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्यांचीच प्रेरणा लक्षात घेऊन मुख्याध्यापक शिवाजी सानप आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शाळेचा कायापालट करण्यासाठी जीवाचे रान केले आणि गेल्या पाच वर्षांची त्याची तपश्चर्या फळाला आली आहे.
खासगी शाळा म्हणजे चांगले शिक्षण असा गोड गैरसमज समाजाने करून घेतलेला आहे। परंतु चांगल्या शिक्षणासाठी आणि संस्कारासाठी पैसा किंवा श्रीमंत शाळेची गरज नसून चांगल्या गुरुची आवश्यकता आहे. तीच गुरु-शिष्याची अनोखी परंपरा या शाळेने जपली आहे. या शाळेनेे शालेय शिक्षणावरच भर न देता सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांची जपणूक केली आहे. "वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन त्यात शून्य कचरा' असा आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक भान विसरत चाललेल्या समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. खासगी शाळेच्या घोडदौडीत आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी देवनार महापालिकेच्या मराठी शाळा क्र.1 ने केलेला हा प्रयत्न नक्कीच सर्व शाळांना प्रेरणा देणारा आहे.
राजेश सावंत
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें