नवी दिल्ली, १३ अगस्ट - गेल्या दोन महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात आठ टक्क्यांनी घट झाली असली तरीही भारतातील इंधन दरावर त्याचा काहीएक परिणाम होणार नसून नजीकच्या काळात इंधनाच्या दरात घट होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, कच्च्या तेलात होणारी घट एक चांगली बाब असून ती स्वागतार्हच आहे तथापि देशातील इंधन दरात मात्र त्यामुळे सध्या कोणतीही घट होणार नाही.
मागच्या महिन्यात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १४७ अमेरिकन डॉलर इतके होते ते आता १०९.८८ अमेरिकन डॉलरपर्यंत घसरले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे चार जूनला देशातील पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती। पेट्रोलियम कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आली होती.
दरम्यान कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती जरी कमी झाल्या असल्या तरीही देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा अजूनही भरून निघाला नाही. त्यामुळे सध्यातरी पेट्रोलच्या दरात घट करता येणार नाही असे स्पष्टीकरण देवरा यांनी दिले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें