मुंबई - परळच्या केइएम रुग्णालयात गोरगरिबांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या "पुअर बॉक्स फंडा'तील दोन कोटी रुपये प्रशासकीय कामांसाठी काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. आयुक्तांच्या परवानगीशिवाय हे पैसे काढण्यात आल्याने हा एकप्रकारचा गैरव्यवहारच असल्याचे म्हटले जाते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर करावयाच्या उपचारासाठी केईम रुग्णालयांत १९२६ साली पुअर बॉक्स फंडाची स्थापना करण्यात आली. दानशूर व्यक्ती व अनेक सामाजिक संस्था या फंडासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देतात. सध्या या फंडात ६ कोटी रुपये जमा आहेत. त्याच्या व्याजातून दरवर्षी महापालिका प्रशासनाला ७० लाख रुपये व्याज मिळते. या व्याजातून रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.
अलिकडेच प्रशासकीय कामासाठी या फंडातील २ कोटी रुपये काढण्यात आले आहेत। या वृत्ताला अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये यांनीही शुक्रवारी महापालिकेतील पत्रकार परिषदेत बोलताना दुजोरा दिला. या फंडातील पैसे काढताना आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची परवानगी घेतली नसल्याचे गजभिये यांनी मान्य केले. या प्रकरणाची सध्या दक्षता विभागामार्फत चौकशी सुरू असल्याचे सूत्रानी सांगितले. सहाय्यक आयुक्त मिलिंद शंभरकर हे या प्रकरणाची चौकशी करीत असून पुढील आठवड्यात त्यांचा अहवाल अपेक्षित आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें