पुणे - ""रशिया व चीन या मोठ्या देशांशी अमेरिकेने यापूर्वीच अणुकरार केला आहे. आता आपल्याबरोबर ते हा करार करत आहेत. देशाला उपयुक्त असलेला करार आपण स्वीकारला पाहिजे,'' असे पुणे विद्यापीठाचे संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत परांजपे यांनी शुक्रवारी सांगितले. कोणताही देश जगापासून फटकून वागू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट'तर्फे आयोजित "इंडो-यूएस न्यूक्लिअर डील : हाऊ गुड हाऊ बॅड' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते। राज्याचे माजी निवडणूक आयुक्त यशवंत राजवाडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजित अभ्यंकर यात सहभागी झाले होते. "एमआयटी'चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, प्रा. डी. पी. आपटे, डॉ. के. आर. भाटिया या वेळी उपस्थित होते. डॉ. परांजपे म्हणाले, ""अणुकरारामुळे संशोधनाचा मार्ग खुला होऊन देशाचे खऱ्या अर्थाने जागतिकीकरण होईल. यातून देशाला वीज उपलब्ध होईल. अर्थात काही मिळविताना काही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे.''
राजवाडे म्हणाले, ""हा करार करताना आपण देशहिताची पुरेशी दक्षता घेतली पाहिजे। यापूर्वी सोव्हिएत संघराज्याशी आपण शस्त्रास्त्रे व औद्योगिक करार केले आहेत.''
अमेरिकेबरोबर करण्यात येणारा अणुकरार देशहिताच्या विरुद्ध आहे. या करारामुळे पुरेशी वीज निर्माण होईल, असे सांगण्यात येत असले, तरी वायूपासून निर्माण केलेली वीज अणुशक्तीपासून निर्माण केलेल्या विजेपेक्षा खूप स्वस्त आहे. त्यामुळे युरेनियम आयात करण्याची गरज नाही. सोव्हिएत संघराज्याच्या विघटनानंतर अमेरिका जगाला आपल्या लहरीप्रमाणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी भूमिका अभ्यंकर यांनी मांडली.
प्रा. मुक्ता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल कराड यांनी आभार मानले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें