मुंबई, ९ अगस्ट- मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात राजीनाम्याचे अस्त्र उपसलेल्या महसूलमंत्री नारायण राणे यांनी यावेळी 'आर या पार' ची लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर काँगेस हायकमांडने सन्मानजनक तोडगा काढला नाही, तर काँगेसचा त्याग करून नवा पक्ष स्थापन करण्याच्या मनस्थितीत राणे असल्याचे समजते. व्हिडिओकॉन कंपनीला नवी मुंबईतील जमीन स्वस्तात दिल्याचा आरोप करून राणे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत। याआधीही दोनवेळा राणे यांनी देशमुख यांना थेट लक्ष्य केले होते. परंतु प्रत्येकवेळी काँगेस हायकमांडने समजूत काढल्यावर राणे यांनी राजीनामा मागे घेतला. यावेळी मात्र त्यांनी पूर्ण विचारांती राजीनामा दिला असून माघार घ्यायची नाही असा निर्धार केला असल्याचे कळते.
काँगेस-प्रवेश करताना त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द काँगेस हायकमांडने दिला होता। पण तो पाळला जात नसल्याची सल राणे व त्यांच्या समर्थकांना बोचत आहे. राणे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीवारी केली. तेथून परतल्यानंतर मुंबईत त्यांनी समर्थकांची बैठक बोलवली होती. मुख्यमंत्रीपद देत नसतील तर कमीतकमी एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री अशा दोन मंत्रिपदांचा प्रस्ताव हायकमांडपुढे मांडा, अशी भूमिका समर्थक आमदारांनी घेतली होती. परंतु त्या प्रस्तावाला हायकमांडने प्रतिसाद दिलेला नसल्याने राणे व त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. एकंदर स्थिती पाहता आगामी निवडणुकीत आमदारांना काँगेसतफेर् उमेदवारी मिळेल की नाही, याची कसलीही खात्री नसल्याने राणेसमर्थक आमदारांत अस्वस्थता आहे.
याच आठवड्यात सोमवारी राणे यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर समर्थकांची बैठक झाली होती। त्यातही 'आर या पार'च्या लढाईचा पवित्रा राणे व समर्थकांनी घेतला असल्याचे कळते. नवा पक्ष काढला तर कितपत पाठिंबा मिळेल, याची चाचपणी राणे यांनी केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडतल्यानंतर नवा पक्ष काढावा, असाच राणे समर्थकांचा दबाव होता. राणे यांच्या काँगेसप्रवेशाला तीन वषेर् उलटली; तरी राणे समर्थक काँगेस पक्षात समरस झालेले नाहीत. वा काँग्रेसनेही त्यांना वाव दिला नाही व सामावून घेतले नाही, ही समर्थकांची खंत आहे. त्यामुळे त्यांचा काँगेसपेक्षा नवा पक्ष स्थापन करावा हा त्यांचा आग्रह आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार राणे करीत आहेत. जनसुराज्यसारख्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन एक आघाडी करायण्याचा त्यांचा विचार असल्याचे समजते. त्याचबरोबर काँगेसमधील नाराज नेते या पक्षात येऊ शकतील. या आघाडीने ३० -३५ जागा जिंकल्या तर भविष्यात राज्याच्या राजकारणावर दबावगट म्हणून काम करता येइल, असा विचार एकूणच राणे यांच्या गोटात चालला असल्याचे कळते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें