बुधवार, 9 जुलाई 2008

जळगावमध्ये घरफोड्या करणारी बच्चागॅंग गजाआड

जळगाव - शहरात घरफोड्या, छोट्या-मोठ्या चोऱ्या करणाऱ्या बच्चे गॅंगला शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या गॅंगमध्ये पाच जणांचा समावेश आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली. तीन जणांचे वय हे कमी असल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले.
भिकमचंदनगरसह इतर भागात बंद असलेल्या घरात घरफोडी करणे, वाहनांच्या बॅटऱ्या चोरून नेण्याचे प्रकार वाढले होते. सातत्याने होणाऱ्या घरफोड्या व चोरींने पोलिस त्रस्त झाले होते. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार नूरोद्दीन शेख, आनंदसिंग पाटील, बाळू निंबाळकर, सुरेश सपकाळे, सुनील पाटील, सतीश डोल्हारे यांनी काही भागांवर लक्ष केंद्रित करून चोऱ्या बच्चेगॅंगकडून होत असल्याचे निदर्शनास आले.
यातील एका मुलास विश्‍वासात घेऊन पोलिसांनी या गॅंगचा छडा लावीत या गॅंगमधील पाचही जणांना आज ताब्यात घेतले. या गॅंगकडून दोन बॅटरी व जैननगरात चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तू हस्तगत केल्या आहेत. काही वस्तू त्यांनी विकल्या असून त्या उद्या हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोषसिंह बिसेन यांनी सांगितले. गॅंगमधील जितेंद्र रामकृष्ण जगदाळे व जितेंद्र रमेश भोई यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या गॅंगकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं: