पुणे - रास्ता पेठेतील कादरभाई चौकात पोलिस व्हॅन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक वर्षाच्या मुलीसह तीन महिला जखमी, तर सात दुचाकींचा चेंदामेंदा झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला.
या अपघातात जखमी झालेल्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तनिष्का यतीन सोनवणे (वय १), सीमा शिवाजी सोनवणे (वय २४), चंद्रा शिवाजी सोनवणे (वय ५२, तिघी रा. २९० रास्ता पेठ, गुरुप्रसाद सोसायटी) अशी त्यांची नावे आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी पोलिस व्हॅन चालक सोमनाथ हरिभाऊ होले (वय ४०, रा. वानवडी पोलिस वसाहत) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक हा व्हॅनमधून नेहरू रस्त्याने चालला होता. तेव्हा कादरभाई चौकात एक रिक्षा डाव्या बाजूने अचानक आली, तेव्हा होलेने व्हॅन वळविली. यामुळे त्याचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले. व्हॅन वेगात पुढे गेल्याने वळणावरील सर्व दुचाकींचा चेंदामेंदा झाला. तेव्हा जखमी स्कुटीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीला व्हॅनची धडक बसली. दर्शन ऑटो कॉर्नर या दुकानाचा दरवाजा तोडून ती व्हॅन थांबली. अपघातानंतर व्हॅन चालक पोलिसाने पळ काढला. तो समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.
दरम्यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुतराव डफळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मनसेचे कार्यकर्ते नीलेश शिंदे, संजय बकरे आदींनी जखमींना रुग्णालयात हलविले. महापालिकेने नेहरू रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जागेवर अद्याप रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. येथे जलवाहिन्या टाकण्याचे काम अपूर्ण असून, खड्डे खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीच उपस्थित नाही, अशा तक्रारी या वेळी नागरिकांनी केल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें