पुणे - आशिया खंडातला सर्वांत मोठा थर्माकोल कोठे तयार होतो, याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. पण, हा थर्माकोल चक्क पुण्यात तयार होतो.
भोसरीतील इलेक्ट्रॉनिक झोनमधील "माने ग्रुप ऑफ कंपनीज'मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या थर्माकोलची निर्मिती होतेय. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या थर्माकोलची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'नेही दखल घेतली आहे। एवढेच काय, पण लहान मुलांसाठीची "पोगो वाहिनी'देखील खेळांचे "सेट्स' उभारण्यासाठी इथल्याच थर्माकोलचा वापर करते.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने, थर्माकोल आणि थर्माकोल स्वयंचलित यंत्राचे भारतातील मोठे उत्पादक आणि निर्यातदार आहेत। माने यांनी मस्कतच्या राजाला तयार करून दिलेल्या थर्माकोल स्वयंचलित यंत्राची नोंद "गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही झाली आहे. माने यांच्या कंपनीत तयार होत असलेला हा थर्माकोलचा ठोकळा १२ फूट बाय चार फूट बाय दोन फूट या आकारातील आहे. हा ठोकळा एका अखंड साच्यात तयार होत असल्यानेच त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तो बनविण्यासाठी १५ मिनिटे इतका कमी कालावधी लागतो.
याबाबत अधिक माहिती देताना श्री। माने म्हणाले, ""पोगो वाहिनीला आतापर्यंत थर्माकोलच्या १७०० ठोकळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. नजीकच्या दिवसांत आणखी तेवढेच ठोकळे तयार करून द्यायचे आहेत. या ठोकळ्यांच्या साह्याने वाहिनी विविध प्रकारची खेळाची साधने तयार करतेच; पण त्याच्या साह्याने खेळांचे मोठमोठे सेट्सही उभारले जातात.''
व्यकंटेश्वरा हॅचरीज या कंपनीच्या अंडी उबवणी केंद्राकडूनही या ठोकळ्यांना मोठी मागणी आहे; तर "उष्णतारोधक' पत्रे तयार करणारी पुण्यातील एक कोरियन कंपनीदेखील याच ठोकळ्यांना प्राधान्य देते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें