मुंबई - हिंदु मुलाशी विवाह केला म्हणून स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे अकरा तुकडे करणाऱ्या आई-वडिलांना सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची सजा सुनावली. आरोपींना आणखी पाच अल्पवयीन मुले असल्यामुळे त्यांचे फाशीचे जन्मठेपेच्या शिक्षेवर निभावले.
अतिरिक्त सत्र न्या. ओ. एस. जयस्वाल यांनी आज सकाळी आरोपी मोहम्मद मुन्ना सरकार खान (३८) व शहनाझ मुन्ना खान (३५) यांना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ व २०७ नुसार हत्या व पुरावे नष्ट करणे या आरोपांसाठी जन्मठेप व सात वर्षे कारावासाची सजा सुनावली. दोन्ही शिक्षा आरोपींना एकाच वेळी भोगायच्या आहेत. तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने सुनावला. मागील तीन दिवस या निकालाचे काम सुरू होते. यावेळी आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चातापाच लवलेशही नव्हता. आरोपींची मयत मुलगी मेहनाझ (१८) हिची सासू रुक्मिणी जाधव यावेळी न्यायालयात हजर होती.
अभियोग पक्षाच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आरोपींना आणखी पाच लहान मुले आहेत. त्यामुळे अभियोग पक्षाची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यामुळे हा गुन्हा अपवादात्मक नव्हता असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही तपास यशस्वीपणे केल्याबद्दल पोलिसांचे न्यायालयाने कौतुक केले.
दरम्यान, या गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास करणारे कफपरेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हिंदुराव पाटील यांनी, आरोपींना फाशीची शिक्षेच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, असे निकालानंतर सांगितले. पोलिसांकडे तपासाचे आव्हान होते पण आम्ही शिताफीने तपास केला, असेही ते म्हणाले.
न्यायालयाच्या निकालाबाबत आम्ही समाधानी आहोत, असे मूर्तझाची सासू रुक्मिणी जाधव यांनी सांगितले. आरोपींना कडक शिक्षा व्हायलाच हवी कारण आई-वडिल असूनही त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या मुलीची हत्या केली ती शहारे आणणारी आहे. या निकालामुळे अन्य आई- वडिलांनाही योग्य ती शिकवण मिळेल, असे जाधव म्हणाल्या. मूर्तझा आम्हाला पसंत होती. ती घरीही वारंवार यायची आणि सगळ्यांशी हसून-खेळून वागायची. मुलाने व तिने लग्न केल्यावर तिच्या वडिलांनी पुन्हा रितसर लग्न लावण्याची तयारी दाखविली आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण नंतर मूर्तझा आम्हाला दिसली नाही, असे त्यांनी रडत रडत सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें