मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरच नव्हे; तर मुंबईच्या महापौर आणि पालिका आयुक्तदेखील उंदरांमुळे हैराण झाले आहेत।त्यांच्या कार्यालयांतील महत्त्वाच्या कागदपत्रांना उंदरांमुळे धोका पोहोचू नये म्हणून प्रशासनावर त्यांच्या दालनात पिंजरे लावण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात मुंबईत उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढतो. रस्त्यांवरील हातगाड्यांवर शिजविले जाणारे अन्न आणि कचरापेट्यांतील कचरा रस्त्यावर वाहून येत असल्याने उंदरांना आयतेच अन्न मिळते. या अन्नामुळे पावसाच्या दिवसांत उंदीर आणि घुशी चांगल्याच धष्टपुष्ट होतात. या दिवसात ठिकठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यात उंदरांचे मलमूत्र मिसळते. त्यामुळे "लेप्टोस्पायरोसिस'चा धोका अधिक असतो.
यंदाच्या पावसात "लेप्टो'ने गेल्या दीड महिन्यात १४ रुग्णांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. "लेप्टो'चा वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेने उंदीर पकडण्यासाठी तातडीने १० हजार पिंजरे खरेदीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीत आणला होता. मात्र एक पिंजरा ६५२ रुपये किंमतीचा असल्याचे ऐकून समिती सदस्यांचे डोळेच पांढरे झाले. या पिंजरे खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केल्याने खरेदीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. उंदरांचा वाढता उपद्रव पाहता पिंजऱ्यांची खरेदी लवकरात लवकर होणे गरजेचे असतानाच उंदरांच्या उपद्रवामुळे दस्तुरखुद्द प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही हैराण झाले आहे. महापौर डॉ. शुभा राऊळ, उपमहापौर विनोद घेडिया, पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्यासह महत्त्वाच्या ८ ते१० कार्यालयांत असे पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें