सोमवार, 21 जुलाई 2008

बसपाच्या चारशेहून अधिक कार्यकर्त्यांची सोडचिठ्ठी

नागपूर, महाराष्ट्राचे प्रभारी कर्नल सुधीर सावंत यांना , कॉंग्रेसचा हेर असा ठपका ठेवून बहुजन समाज पक्षातून काढल्यामुळे बसपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला. नागपुरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट झाले.
सावंत यांना पक्षातून काढून टाकल्याला विरोध म्हणून सुमारे चारशेवर कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांच्याकडे राजीनामे देऊन बसपाला सोडचिठ्ठी दिली.
बहुजनांच्या हाती सत्ता देण्याचे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी राजीनामा दिलेले सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रात मिशनरी कार्यकर्त्यांची शक्ती उभारणार असल्याचा संकल्प कर्नल सावंत यांनी बोलून दाखवला. सुमारे एक ते दीड हजारांवर कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात तो स्वीकारला. बैद्यनाथ चौकातील कामगार भवन सभागृहात आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतूनही बसप कार्यकर्ते आले होते. बसप आणि बामसेफ मिशनमधील जुन्या कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आलं होतं.
कांशीराम यांच्या मिशनवर श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांची शक्ती महाराष्ट्रात उभी करण्यात येणार असल्याती माहितीही यावेळी बोलताना सावंत यांनी दिली. या शक्तीतून बसप प्रदेशाध्यक्ष विलास गरूड आणि त्यांच्या कंपूचे खरे स्वरूप मायावती यांच्या नजरेत आणून देण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली. आपण त्यांच्या भूलथापांना बळी न पडल्यामुळे , मायावतींकडे आपली तक्रार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोई टिप्पणी नहीं: