बिलासपुर, ३ अगस्ट- हिमांचल प्रदेशात विलासपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नयना देवीच्या देवळात आज झालेल्या चेंगराचेंगरीत रेलिंग कोसळून १२० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत।
शनिवारपासून सुरू झालेल्या श्रावण अष्टमी यात्रेसाठी आज रविवार असल्यानं भाविकांनी प्रचंड गर्दी केली। देवीच्या दर्शनासाठी देवळात एकाच वेळी झुंबड उडाली. या चेंगराचेंगरीत देवळाच्या बाहेरचं रेलिंग कोसळलं आणि भाविकांचा तोल गेला. शेकडो भाविक खाली कोसळले आणि त्यात सुमारे १२० जण जागीच ठार झाले. त्यातील ६० शवं टेकडीवरून खाली आणण्यात आली आहेत. जखमींची संख्याही मोठी असल्यानं त्यांना विलासपूर आणि चंढिगडच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु हवामान अत्यंत खराब असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत.
नयना देवीचं हे मंदिर उंच टेकडीवर आहे. दरवर्षी तिथे भरणा-या यात्रेवेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं सर्व तयारी केली होती. परंतु, आज सुट्टीचा दिवस असल्यानं हजारो भाविकांनी एकदम गर्दी केली आणि देऊळ परिसरात शंभर पोलिस असूनही ते या गर्दीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. या चेंगराचेंगरीत अनेकजण एकमेकांखाली चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें