मंगलवार, 30 सितंबर 2008

शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेवच

पुणे, ३० सप्टेम्बर- छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी कोंडदेव होते, हे सांगणारे इतिहासात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर यांनी सोमवारी केला। शहाजी राजांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी आधीच्या पुरस्कारातून दादोजी कोंडदेव यांचे नाव काढून टाकणे गैर आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का नव्हते, हे निष्कर्ष पुरस्कारासाठी लावणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काही मोजक्या व्यक्ती आणि संघटनांच्या दडपणाखाली सरकारने समिती नेमली असून त्यांच्या अभ्यासावर आधारित चुकीचे निर्णय सरकार घेत असल्याची टीका बलकवडे यांनी केली. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिकवल्याचे उल्लेख असून त्याकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीत परस्परच नेमणूक केली असून आपल्याला याबद्दलची माहिती वृत्तपत्रातूनच कळाली असल्याचे मेहेंदळे आणि बेडेकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे कोणतेही लेखी पत्र किंवा साधा फोनही अधिकृतरित्या केला नसल्याचे ते म्हणाले. या समितीत १५ अभ्यासक असून यातल्या १० जणांना इतिहासातले काहीही कळत नसल्याचे बेडेकर यांनी नमूद केले. ज्यांना फारसी, मोडी आणि पशिर्यन येत नाही ते कसले अभ्यासक असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकार संशोधनात जातीयवाद आणत असून दादोजी कोंडदेव ब्राह्माण होते म्हणूनच त्यांचे नाव बाजूला करण्याचा घाट काही संघटना आणि व्यक्तींनी घातला असल्याचे मेहेंदळे म्हणाले. या सर्व घटनांचा संशोधनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


1 टिप्पणी:

subhash ने कहा…

visit-
www.dadojikonddev.blogspot.com