मुंबई, ३१ जुलाई- हा 'प्रहार' सूडाचा नसेल, प्रबोधनाचा असेल. सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असून आपल्यातील मंत्री व पत्रकार एकमेकांना निश्चितच छेद देणार नाहीत, अशी ग्वाही महसूलमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी मुंबईत दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर (नऊ ऑक्टोबर) राणे संपादकाच्या भूमिकेत शिरत असून त्यांच्या 'प्रहार' या दैनिकाची घोषणा मुंबईत झाली.
आपल्याला लहानपणापासून वाचनाचा छंद होता, असे सांगून राणे म्हणाले की, आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत, त्याचे श्रेय या वाचनाला व वृत्तपत्रांनाच जाते. आपण जरी सरकारचा भाग असलो तरी, वस्तुस्थिती कायम मान्य करतो. दैनिकातही आपण वस्तुनिष्ठ भूमिकाच मांडू, असेही त्यांनी सांगितले. या दैनिकात केवळ राजकारण नसेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावरही ते भर देईल, असे राणे म्हणाले. आपण या वृत्तपत्रात अग्रलेखही लिहिणार असल्याचे सूतोवाच करताना राणे यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्ानंना मनमोकळी उत्तरे दिली. राणे या दैनिकाचे मुख्य संपादक; तर आल्हाद गोडबोले संपादक असणार आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें