मंगलवार, 29 जुलाई 2008

अहमदाबाद स्फोटांचे धागेदोरे मुंबईत

मुंबई, २९ जुलै- अहमदाबादमध्ये झालेल्या मालिकाबद्ध बॉम्बस्फोट प्रकरणाचा संबंध नवी मुंबई पाठोपाठ आता मुंबईशी जोडला जात आहे. दक्षिण मुंबईतील इक्बाल गेस्ट हाऊसमध्ये स्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरुन तीन तरुणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी पकडलेले तिघेहीजण काश्मिरी असून त्यांची चौकशी सुरू आहे.
बंगळुरू पाठोपाठ अहमदाबादमध्ये स्फोट झाल्यानंतर देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे। अनेक ठिकाणी हॉटेल , गेस्ट हाऊस , धर्मशाळांमध्ये छापे टाकून संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली. मुंबईतही अशीच कारवाई सुरू असताना पोलिसांना इक्बाल गेस्ट हाऊसमध्ये राहणा-या काश्मिरी तरुणांचा संशय आला. पोलिसांनी विचारलेल्या काही प्रश्नांना त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. या तरुणांची चौकशी सुरू आहे.
याआधी अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या काही मिनिटे आधीच ‘ हिंमत असेल तर बॉम्बस्फोट रोखून दाखवा ,’ अशी धमकी देणारा ई-मेल नवी मुंबईच्या सानपाडा भागातील एका घरातून पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या घरावर छापा टाकून एका अमेरिकन व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता स्फोटांचे धागेदोरे मुंबईत आढळून आले आहेत.

कोई टिप्पणी नहीं: