शनिवार, 19 जुलाई 2008

एअरटेलची नेटवर्क यंत्रणा जळून खाक

मुंबई, ता. १९ - लोअर परळ येथील पेनीनसुला चेंबर्स इमारतीच्या तळमजल्यावर दिनांक १८ रोजी सकाळी भीषण आग लागली.
या आगीत एअरटेल मोबाईल नेटवर्कचा पुरवठा करणारी यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाल्याने शहरातील हजारो एअरटेल मोबाईल ग्राहकांचे फोन आज दिवसभर बंद होते. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे सोळा बंब ही आग विझविण्याची शर्थ करीत होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोअर परळच्या प्रसिद्ध पेनीनसुला पार्कमध्ये असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या इमारतीत मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. इमारतीचा तळमजला व पहिल्या मजल्यावर एअरटेलचे कार्यालय आहे. तळमजल्यावर या मोबाईलला नेटवर्क पुरविणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वाहिन्या या इमारतीच्या आतील बाजूने इमारतीच्या टेरेसपर्यंत जातात. या यंत्रणेत असलेल्या वाहिन्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मोबाईलला नेटवर्क पुरविण्यात उपयोगी ठरणाऱ्या वाहिन्यांच्या जाळ्यालाच ही आग लागली आणि काही क्षणातच ती संपूर्ण तळमजल्यावर पसरली. तळमजल्यावरून धुराचे लोट येऊ लागल्यानंतर इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
अग्निशमन दलाच्या सोळा बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या तळमजल्यात शिरून आग विझविताना जवानांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत एअरटेलची नेटवर्क यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाल्याने शहरातील एअरटेलच्या हजारो ग्राहकांना त्याचा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत एअरटेलची ही विस्कळित झालेली सेवा पूर्वपदावर आली नव्हती.

कोई टिप्पणी नहीं: